पुणे:- पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागातील निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘रिपब्लिकन संघर्ष सेना‘ या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या निरीक्षकांमुळे शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत, या निरीक्षकांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य संघटक-सचिव आयु. अंकुश रघुनाथ सोनवणे यांनी पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना (आकाश चिन्ह व परवाना विभाग) यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदन नमूद केल्यानुसार, पुणे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनेक आकाश चिन्ह निरीक्षक गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागी कार्यरत आहेत.

एकाच ठिकाणी प्रदीर्घ काळ नियुक्ती असल्यामुळे संबंधित निरीक्षकांचे स्थानिक अनधिकृत होर्डिंग मालक, फ्लेक्स लावणारे आणि मांडववाले यांच्याशी घनिष्ठ आर्थिक हितसंबंध निर्माण झाले आहेत. यामुळेच शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही, असा थेट आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेने प्रशासनासमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत अनेक वर्षांपासून एकाच क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व आकाश चिन्ह निरीक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि अनधिकृत होर्डिंगकडे डोळेझाक करणाऱ्या निरीक्षकांच्या या बेजबाबदार वर्तणुकीची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात (Service Book) कायमस्वरूपी घेण्यात यावी. भ्रष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांची चौकशी करून प्रशासकीय शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी.
प्रशासनाने या निवेदणाची दखल घेऊन तात्काळ पावले न उचलल्यास, सामाजिक हितासाठी रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या वतीने तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
पुणे शहरातील वाढत्या अनधिकृत होर्डिंगच्या समस्येमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना, आता या प्रकरणातील अंतर्गत ‘अर्थपूर्ण’ लागेबांधे चव्हाट्यावर आल्याने पालिका प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


