पुणे (प्रतिनिधी):- पुण्यातील कर्वेनगर भागात अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग आणि साठवणुकीच्या काळ्या धंद्यावर रिपब्लिकन संघर्ष सेनेने धडक कारवाई केली आहे. ‘मंगलमूर्ती गॅस’ या ठिकाणी सुरू असलेल्या या जीवघेण्या प्रकाराचा संघटनेने पर्दाफाश केला असून, वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपीसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
कर्वेनगर येथील ‘मंगलमूर्ती गॅस‘ येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅसची चोरी (Refilling) केली जात असल्याची माहिती रिपब्लिकन संघर्ष सेनेला मिळाली होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयु. शशिकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथे अत्यंत असुरक्षित वातावरणात गॅस ट्रान्सफर करण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले.
मोठा मुद्देमाल जप्त, पोलिसात गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणी दरम्यान खालील साहित्य जप्त करण्यात आले:
* गॅस रिफिलिंगसाठी वापरले जाणारे विशेष डिझाइनचे पाईप.
* १५ ते २० छोट्या गॅस टाक्या.
* भारत गॅससह विविध कंपन्यांचे १० ते १२ मोठे सिलेंडर.
* वाहतुकीसाठी वापरला जाणारा एक टाटा टेम्पो.
या प्रकरणी पोलिसांनी दुकान चालकाला ताब्यात घेतले असून, रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

“प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचा जीव धोक्यात” – श्रीकांत दारोळे यांचा इशारा
या कारवाईनंतर रिपब्लिकन संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव श्रीकांत दारोळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, “निवासी भागात अशा प्रकारे गॅस रिफिलिंग करणे म्हणजे जिवंत बॉम्बवर राहण्यासारखे आहे. आम्ही यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाला पत्रव्यवहार केला आहे, मात्र प्रशासनाला याचे गांभीर्य नाही.”
“गोरगरिबांच्या हक्काचा गॅस चोरणाऱ्यांची आता खैर नाही. जर प्रशासनाने या माफियांच्या विरोधात ठोस पावले उचलली नाहीत, तर रिपब्लिकन संघर्ष सेना रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन करेल. जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही गुन्हे अंगावर घ्यायलाही तयार आहोत,” असा इशारा दारोळे यांनी दिला.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
रहिवासी भागात अशा बेकायदेशीर कामांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता असते. रिपब्लिकन संघर्ष सेनेच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे कर्वेनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, शहरातील इतर भागांतही अशाच प्रकारे सुरू असलेल्या अवैध केंद्रांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.


