पुणे:- गॅस सिलिंडरमधून छुप्या पद्धतीने गॅस काढून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या ‘देगलूरकर गॅस एजन्सी‘चा काळाबाजार ‘रिपब्लिकन संघर्ष सेने‘ने उघडकीस आणला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि पोलीस विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने, रिपब्लिकन संघर्ष सेनेचे राष्ट्रीय सचिव आयु. श्रीकांत दारोळे यांनी संघटनेच्या वतीने उद्या, २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
नेमका प्रकार काय?
आळंदी-मरकळ रोडवरील तनिश सोसायटी शेजारी ‘देगलूरकर गॅस एजन्सी‘चे अनधिकृत कार्यालय कार्यरत आहे. या ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅसची चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. रिपब्लिकन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या आदेशानुसार शिष्टमंडळाने ज्यामध्ये श्रीकांत दारोळे राष्ट्रीय सचिव, एकनाथ अडसूळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सुभाष सहजराव उपाध्यक्ष महाराष्ट्र, अंकुश सोनवणे संघटक सचिव महाराष्ट्र राज्य, अमित बगाडे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, फिरोज शेख जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा, आकाश गायकवाड सचिव पुणे शहर व कार्यकर्ते यांनी नागरिकांसमावेत पाहणी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले:

* कमी वजनाचे सिलिंडर: मॅनेजर आणि कामगारांच्या उपस्थितीत वजन केले असता, सिलिंडरचे वजन २७ ते २८ किलो भरले (जे साधारणपणे ३० किलोच्या आसपास असणे अपेक्षित असते).
* चोरीचे साहित्य जप्त: वाहन क्रमांक MH.14.CP.8796 च्या झडतीमध्ये ड्रायव्हर सीटखाली गॅस चोरीसाठी वापरली जाणारी ‘लोखंडी पोंगळी’ (रिफिलिंग पाईप) आढळून आली.
* विनापरवाना कारभार: ही एजन्सी मुळात खडकी येथील असून, आळंदी परिसरात तिचे कार्यालय पूर्णपणे अवैध असल्याचे समोर आले आहे.

लोकवस्तीला धोका: ‘बॉम्ब’वर बसलेली तनिश सिटी!
तनिश सिटी सारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात एका भंगार सहाचाकी वाहनामध्ये (MH.04.CU.7434) गॅस टाक्यांचा मोठा साठा अत्यंत असुरक्षित पद्धतीने करून ठेवला आहे. एखादी छोटी ठिणगी पडल्यास हजारो नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीषण परिस्थिती येथे पाहायला मिळाली.
प्रशासनाचे संशयास्पद मौन?
या गंभीर प्रकाराबाबत ‘११२’ वर कॉल करून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व पुरावे समोर असतानाही पुरवठा विभाग आणि पोलिसांनी कोणतीही जप्तीची कारवाई केली नाही. “प्रशासन राजकीय किंवा आर्थिक दबावाखाली दोषींना पाठीशी घालत आहे का?” असा संतप्त सवाल श्रीकांत दारोळे यांनी उपस्थित केला आहे.

प्रमुख मागण्या:
१. देगलूरकर गॅस एजन्सीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा.
२. संबंधित मालक, कर्मचारी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
> “आम्ही पुराव्यासकट हा घोटाळा पकडून दिला आहे, तरीही प्रशासन ढिम्म आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही उद्या दुपारी १२ वाजेपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत. या काळात होणाऱ्या परिणामांना प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल.”—श्रीकांत दारोळे ( राष्ट्रीय सचिव, रिपब्लिकन संघर्ष सेना)
या प्रकरणामुळे आळंदी परिसरात खळबळ उडाली असून, आता जिल्हा प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


